टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!   

वृत्तवेध 

दिवाळी बोनस म्हटले की सर्वत्र चर्चा असते ती गुजरातमधील हिरे व्यापार्‍यांची. त्यात विशेष चर्चा असते ती सावजी ढोलकिया यांच्याकडून त्यांच्या कर्मचार्‍यांना देण्यात येणार्‍या कार आणि फ्लॅटची. त्यामुळे, गुजरातमधील उद्योगपतींचा हा आदर्श प्रत्येक कंपनीने, कंपनीच्या मालकाने घ्यावा, अशी इच्छा कर्मचार्‍यांकडून व्यक्त केली जाते. त्यात आता आणखी एका गुजराती कंपनीचे नाव जोडले जाऊ शकते. गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील एका ज्वेलर्स कंपनीने २०० कोटी रुपयांचे टार्गेट पूर्ण केल्यानंतर कर्मचार्‍यांना चक्क एसयूव्ही कार गिफ्ट केल्या आहेत. दोन भावांनी १९ वर्षांपूर्वी ज्वेलर्सच्या धंद्यात पाऊल ठेवले. के के ज्वेलर्स नावाने या कंपनीची सुरुवात झाली. आजमितीला या कंपनीने २०० कोटींचा टर्नओव्हर पूर्ण केला आहे. कंपनीने पहिले शोरुम सुरू केले तेव्हा बारा कर्मचारी कामाला होते. त्या वेळी या कंपनीचा टर्नओव्हर दोन कोटी रुपये होता. त्यामुळे, कंपनीने २०० कोटींचा टर्नओव्हर पूर्ण केल्यानंतर आपण कंपनीतील कर्मचार्‍यांसोबत मोठे सेलीब्रेशन करायचे असा निर्णय दोन्ही भावांनी घेतला होता.
 
दोन दशकाच्या कष्टाला फळ
 
तब्बल १९ वर्षांच्या कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर कंपनीने हे यश संपादन केले असून अलिकडेच २०० कोटींचा टर्नओव्हर पूर्ण केला आहे. दोन्ही भावांनी आपला संकल्प पूर्णत्वास नेल्यामुळे मनात ठरवल्याप्रमाणे आपल्या कर्मचार्‍यांसोबत जंगी सेलिब्रेशनही केले आहे. कैलाश काबरा यांनी २००६ मध्ये ज्वेलरी उद्योगात प्रवेश केला, त्या वेळी १२ कर्मचार्‍यांना घेऊन कंपनी सुरू झाली होती. आज काबरा ज्वेलर्स यांच्या केके कंपनीकडे १४० कर्मचारी आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने २०० कोटींचा टर्नओव्हर पूर्ण केला आहे.
 
कर्मचार्‍यांसाठी लक्झरी कार
 
आपल्या कर्मचार्‍यांच्या, टीमच्या कष्ट आणि मेहनतीशिवाय हे शक्य नव्हते. त्यामुळेच स्वत:साठी लक्झरी कार घेण्याऐवजी आपल्या कर्मचार्‍यांसमवेत हा आनंद साजरा करण्यात खरा आनंद असल्याचे कैलाश काबरा यांनी म्हटले. तसेच सुरुवातीपासून काबरा ज्वेलर्सचा भाग राहिलेल्या कर्मचार्‍यांना सन्मानित करताना आपण कार गिफ्ट केल्याचे त्यांनी सांगितले. त्यातून कंपनीतील वरिष्ठ आणि ज्येष्ठ बारा कर्मचार्‍यांना या कार गिफ्ट देण्यात आल्या आहेत. महिंद्रा एक्सयूव्ही ७००, टोयोटा इनोव्हा, ह्युंडाई आय १०, ह्युंडार्ई एक्स्टर, मारुती सुजुकी एर्टिगा आणि मारुती सुजुकी ब्रेझा आदी कार्स कंपनीने भेट म्हणून दिल्या आहेत.
 
आयपीओ लिस्टेट कंपनी
 
दरम्यान, ‘काबरा ज्वेलर्स’ ही आयपीओमध्ये लिस्टेड कंपनी असून कंपनीचा गेल्या आर्थिक वर्षातील टर्नओव्हर १७० कोटी रुपयांचा होता. त्यानुसार, यंदाच्या आर्थिक वर्षात कंपनीने २०० कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे.

Related Articles